प्रस्तावना
मागील अनेक शतके रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे शिरगाव ते तिसंगीया सातगाव परिसरात वास्तव्य असलेले तसेच आपल्या वाडवडिलांच्या व पर्यायाने आपल्या जन्म व कर्मभूमीवर असलेल्या नितांत प्रेम व आदरामुळे गावागावातील सीमा विसरुन आपली ‘सातगाव भोसले’ ही पारंपरिक आणि सामाजिक ओळख आपण अभिमानाने जपत आलो आहोत.
‘सातगाव भोसले’ परिवारातील लहान थोर सर्वांना एकत्र करून त्याचा थेट फायदा आपल्या नवीन पिढीतील होतकरू युवायुवतींना करून देणे, आपला इतिहास, परंपरा, सण, व्रते व उत्सव याची माहिती संकलित करून ती कायम स्वरूपी आपल्या पुढील पिढ्यांना उपलब्ध करून देणे, आपली ऐतिहासिक व धार्मिक शक्तीस्थळे व ऊर्जा स्रोतयांची माहिती आपल्या समाजापर्यंत पोहोचविणे व आपल्या समाजातील सर्व थरातील बंधू-भगिनींना आपल्या एकत्र येण्याचा विविध प्रकारे फायदा करून देणे, ही व अशी अनेक समाजोपयोगी ध्येय उद्दिष्टे समोर ठेवून शहराकडे राहणाऱ्या आपल्या बंधूनी वेळोवेळी सभा घेतल्या आहेत.
मागील काही वर्षां पासून भोसले परिवारातील सुख:दुखातील गोष्टी आपण समाजमाध्यमांद्वारे जाणून घेत असून गाव आणि शहरात राहणारी सातगाव भोसले कुलीन मंडळी एकमेकांशी थेट जोडली जात आहेत तसेच मुंबई व ग्रामीण भागात वेळोवेळी होणाऱ्या बैठकांमध्ये आपली उपस्थिती वाढु लागली आहे. सन २०१८ पासून प्रत्येक वर्षी ‘सातगाव भोसले’ दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत असून तिचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील सप्तशिवालया पैकी गुरुगादी असलेल्या ‘पर्वत’ येथील श्री जोम मल्लिकार्जुन देवालयाच्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी ‘सातगाव भोसलें’च्या माध्यमातून काही सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सेवारूपी प्राथमिक इच्छा मनी बाळगून भोसले बंधूंनी शिंदी, उचाट आणि वाघावळे या तिन ठिकाणी दोनदा जाऊन तेथील ग्रामस्थांसमोर आपली सर्वसमावेशक भूमिका मांडली आहे व सातत्याने पाठपुरावा करून भक्तांसाठी सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
‘सातगाव भोसले’ समाजाच्या ग्रामीण व शहरीभागात मागील कालावधीत वेळोवेळी झालेल्या सभांमधून एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला, तो म्हणजे आपणास अपेक्षित कार्य करण्याच्या दृष्टीने ‘सातगाव भोसलें’ची एक अधिकृत संघटना असणे हि काळाची गरज होती. दिनांक ०२.१२.२०१८ रोजी ठाणे येथे झालेल्या सभेत ‘सातगाव भोसलें’ची हक्काची संस्था स्थापन करण्याबाबत उपस्थितांचे एकमत झाले आणि त्यानंतर पुढील कालावधीत झालेल्या साधारण १० सभांनंतर दि. १८.०८.२०१९ रोजी ‘सातगाव भोसले प्रतिष्ठान’ या नावाने संस्था स्थापन करून नियोजित कार्यक्रमाला ठोस व अधिकृतरित्या चालना देण्याचे ठरले.
या मनोगताद्वारे सातगाव भोसले परिवारातील सर्व कुळ बंधू व भगिनींना नम्र विनंती आहे कि १८ वर्षावरील सर्वांनी ‘सातगाव भोसले प्रतिष्ठान’चे आजीव सभासद होऊन ‘सातगाव भोसले’ या विशाल परिवाराच्या माध्यमातून संस्थेची ध्येयउद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊन सर्वसमावेशक सामाजिक प्रगती साधू या.
अधिक माहिती साठी युट्युब लिंक https://www.youtube.com/watch?v=jlVStNNsjNQ च्या माध्यमातून ‘संस्था स्थापना माहितीपट’ पहावा, हि नम्र विनंती.